नवी दिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयीही काही वक्तव्ये केली. मात्र, ती वक्तव्ये सभागृहाच्या कामकाजातून वगळण्यात आली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर राज्यसभेत चर्चा झाली. त्या चर्चेत सहभागी झालेल्या खर्गे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारावेळी मोदींनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला.
पिछले १० साल तो बस ट्रेलर था. अभी असली पिक्चर बाकी है असे मोदींनी प्रचारावेळी वारंवार म्हटले. तो पिक्चर कसा असेल याची कल्पना महिनाभरातील घटनांवरून येते. परीक्षांचे पेपर फुटले, अनेक परीक्षा रद्द झाल्या. रेल्वे अपघात घडला. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडले यांसारख्या काही घटनांकडे खर्गे यांनी लक्ष वेधले. मागील ७ वर्षांत पेपरफुटीचे ७० प्रकार घडले. त्यामुळे २ कोटी विद्यार्थ्यांचे भवितव्य प्रभावित झाले.
देशातील परीक्षा पद्धतीत सुधारणा केली जावी. परीक्षांमधील गैरप्रकारांचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली. इतरही मुद्द्यांवरून मोदी आणि त्यांच्या सरकारला घेरताना खर्गे यांनी वारंवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला.