पिंपरी (प्रतिनिधी) – काळेवाडी येथे एका दुकानदाराने पिंपळाच्या दोन मोठ्या झाडांची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुकानाकडे झुकलेल्या धोकादायक फांद्या छाटण्याची परवानगी घेऊन संपूर्ण झाडेच तोडण्यात आली आहेत. याबाबत महापालिकेचा उद्यान विभाग जागा झाला असून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
काळेवाडीत लकी बेकरी ते नढे कॉर्नर हा १८ मीटर रुंद डीपी रस्ता महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला १० ते १५ वर्षांपूर्वी पिंपळ, वड अशी झाडे लावण्यात आली. ही झाडे आता मोठी झाली आहेत.
मात्र, एका दुकानदाराने दुकानासमोर येणाऱ्या दोन मोठ्या झाडांची खोडापासून कत्तल केली आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दिवसेंनदिवस वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.
विनापरवानगी झाड तोडणे हा कायद्याने गुन्हा असून तरीही सर्रासपणे झाडे तोडली जात आहेत. याकडे महापालिकेचा उद्यान विभाग मात्र, दुर्लक्ष करत असल्याचे पर्यावरण प्रेमी बोलत आहेत.
कायदा काय सांगतो
विनापरवाना वृक्षतोड करणे, झाडांच्या फांद्या छाटणे, अथवा झाड जाळणे असे कोणतेही वर्तन करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा गुन्ह्यास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम १९७५ नुसार पाच हजार दंड आणि १ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा आहे.
काळेवाडी येथील डीपी रस्त्यालगतच्या नितीन जयराम उदासी यांना १४ जून २०२४ रोजी दुकानाच्या दिशेला वाळलेल्या धोकादायक फांद्या छाटण्याची परवानगी दिली होती. मात्र, अर्जदाराने दोन झाडे पूर्णपणे तोडली आहेत.
तोडलेल्या झाडांचा पंचनामा करण्यात आला आहे. संबंधितांना २६जून २०२४ रोजी कारणे दाखवा नोटीस दिली आहे. सात दिवसांत खुलासा आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. – रविकिरण घोडके, उपायुक्त, उद्यान विभाग, महापालिका