अकोला : अकोल्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये कूलरचा शॉक लागून 2 चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील काळेगाव या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे. ईशानी प्रवीण ढोले (4 वर्षे) आणि प्रियांशी सोपान मेतकर (5 वर्षे) असं कुलरचा शॉक लागून मरण पावलेल्या मुलींची नावे आहेत.
काय घडले नेमके?
अकोला जिल्ह्यातील काळेगाव येथे या अपघातात मृत पावलेल्या दोन्ही मुली आपल्या मामाकडे राहायला आल्या होत्या. दरम्यान आज दुपारी घरात खेळत असतांना अचानक त्यांचा कूलरला हात लागला. दरम्यान, त्यांना जोरदार शॉक लागला अन् यात दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली असून या दोन चिमुकल्यांच्या मृत्यूच्या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
अलिबागमध्ये 2 जण बुडाली
अशीच एक दुर्दैवी घटना अलिबाग तालुक्यातील मूनवली येथे घडली आहे. यात मूनवली येथील तलावात दोन मुले बुडाली आहेत. त्यापैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. तर आणखी एक जण बेपत्ता असून त्याचा शोध सध्या घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.