लोकसभा निवडणुकीच्या निकालनंतर राज्यातील राजकीय पक्षांचे समीकरण बदलतांना दिसत आहे. या निकालामध्ये मविआला जास्त जागा मिळाल्या अशात महायुतीला अपेक्षा पेक्षाही कमी जागा मिळाल्यामुळे या निकालाचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात अजित पवार यांच्यामुळे महायुतीला जास्त जागा जिंकता आले नाही असा आरोपही भाजप नेत्यांसह आरएसएसने केल्यामुळे महायुतीत राजकारण तापले आहे.
दरम्यान, अजित पवार गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच पिंपरी चिंचवड येथील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या १६ माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा पवार यांच्या पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती समोर येत आहे.
शरद पवार यांनी आता आपले लक्ष एकच आहे आणि ते म्हणजे आगामी विधानसभा निवडणुका..” असं म्हटलं आहे. अशात लोकसभेतील यशानंतर आता शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलं आहे. या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करत असताना इतर पक्षातून येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांसाठी पवार यांनी आपल्या पक्षाची दारे खुली केल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या महिला नेत्या आणि माजी केंद्रिय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर कोल्हापुरातील अजित पवारांच्या पक्षातील नेतेही शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता पिंपरी चिंचवड येथील माजी नगरसेवकांनी पवार यांची भेट घेतल्याने अजित पवार यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.