करोना इफेक्ट : कृतीतून दिला सुरक्षिततेबाबत अप्रत्यक्ष संदेश
मुंबई : जगभरात करोना विषाणूचा सामना करण्यासाठी वैद्यकीय पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडून सर्वांना खबरदारीचे उपाय सांगण्यात येत आहेत. एकीकडे प्रशासनाकडून जनजागृती केली जात असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृतीतून दाखवून दिले.
प्राथमिक शिक्षा, कौशल्य विकास, बाल संरक्षण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रथम संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वाय बी चव्हाण प्रतिष्ठान येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात प्रथम संस्थेला अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था आणि मान्यवरांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान शरद पवारांनी करोना सुरक्षिततेबाबत अप्रत्यक्ष संदेश दिला. शरद पवारांनी पुरस्कार घेतल्यानंतर हात मिळविण्यासाठी आलेल्या पुरस्कारकर्त्याला हात न मिळविता दोन वेळा हात जोडून नमस्कार केला.
शरद पवारांच्या या कृतीने सभागृहात हशा पिकला, तर पवारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य दिसले. प्रथम संस्थेच्या शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना समर्पित करण्यात आलेल्या पुस्तकाचे शरद पवारांनी विमोचन केले.
शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा
या कार्यक्रमादरम्यान शरद पवारांकडून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यात आला. माझे स्वतःच शिक्षण जिल्हा परिषद शाळेत ग्रामीण भागात झाले.
स्त्रीने शिक्षणाची आस्था सोसल्यानंतर सर्व घर बदलते. आईने शिक्षणासाठी दिलेल्या प्रोत्साहनाची आठवणही त्यावेळी काढली. माझ्या आयुष्यावर चांगला परिणाम जे. पी. नाईक आणि चित्रा नाईक यांच्यामुळे झाला.
आशियात प्राथमिक शिक्षणात मोलाची कामगिरी करणाऱ्यांसोबत मला त्यावेळी काम करण्याची संधी मिळाली, असे शरद पवार म्हणाले.