Sandeep Gill | pune police | Drugs : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातून आणखी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एफसी रोडवरील एका हॉटेलमधील काही तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात या पार्टीमध्ये काही तरुण चक्क बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना दिसून येत आहे.
या घटनेने आता पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आहे.
या विषयी बोलताना पोलीस उपायुक्त संदीप गिल म्हणाले की, “पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 8 जणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत.
या प्रकरणाची योग्य चौकशी होणार आहे. पार्टी करणाऱ्या ग्रुपने जेवण आणि दारूवर 80 ते 85 हजार खर्च केले आहेत. 40 ते 50 जणांची तपासणी होणार आहे. सीसीटीव्ही पाहून तपासणी केली जाणार आहे.
अनेकदा सूचना देऊनदेखील अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्यात दिरंगाई दाखवली म्हणून दोन अधिकारी आणि दोन अमलदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती संदीप गिल यांनी दिली आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
“पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर आम्ही तब्बल आठ ते नऊ महिन्यापासून सातत्याने भूमिका मांडत आहोत. जेव्हा कोट्यवधींचे ड्रग्जचे साठे सापडले होते. तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले होते.
शंभूराज देसाई यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. तसेच उत्पादन शुल्कचे अधिकारी राजपूत यांचेही निलंबन झाले पाहिजे. असे केल्याशिवाय पुणे सुधारणार नाही,” अशी भूमिका सुषमा अंधारे यांनी मांडली.
शंभुराज देसाई यांचे प्रत्युत्तर
“हा व्हिडिओ आताच पहिला असून याची चौकशी आम्ही करू. रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या महिन्याभरात आपण पुण्यात ४९ हॉटेल आणि बारवर कारवाई केली आहे. तसेच पुण्यात सरप्राईज चेकिंग सुरु करण्यात आले आहे.
या प्रकारची गंभीर दखल घेऊन चौकशी करणार आहे. तेथील क्षेत्रीय अधिकाऱ्याचीही चौकशी करणार आहोत. कुठल्याही अधिकाऱ्याबरोबर सरकारचे साटेलोटे नसून जो अधिकारी यात दोषी आढळेल, त्यावर कारवाई केली जाईल,”असे आश्वासन शंभुराज देसाई यांनी दिले.
तर याप्रकरणावरून आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील शंभुराजे देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यात पोलिसांची चूक आहे. अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. पैसे घेतल्यामुळे असे धंदे चालतात.
राजपूत नावाच्या अधिकाऱ्याला महिन्याला तीन कोटी रुपये मिळतात, ते मंत्र्यांना पोहचात. तो हप्ता शंभूराज देसाई यांना जातो, असा मोठा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.