मेष : प्रसिद्धीचे योग
तुमचे मनोधैर्य चांगले असल्याने अडथळ्यांवर मात कराल. व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी काही ठोस पावले उचलाल. त्याचा तुम्हाला फायदा होईल. नोकरीत कामे स्वीकारताना स्वतःची पात्रता ओळखून पुढे जा. कलावंतांना प्रसिद्धीचे योग येतील. कवी-साहित्यिकांच्या हातून उत्तम लेखन होईल. महिलांनी सभोवतालच्या व्यक्तींशी होणारे वादविवादाचे प्रसंग टाळावेत.
वृषभ :जबाबदारी वाढेल
कामाच्या वेळी काम व इतर वेळी आराम, असे धोरण असेल. आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी प्रयत्नशील राहाल. व्यवसायात उधारी वसुलीकडे लक्ष केंद्रित करा. पैसा चांगला मिळेल. परंतु, खर्चही तसाच असेल. नोकरीत वरिष्ठांनी दिलेली आश्वासने ते पाळतील. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील.
मिथुन :खरेदीचे योग
कर्तव्याला प्राधान्य देऊन अवघड कामे मार्गी लावाल. व्यवसायात स्वतःचे वेगळेपण सिद्ध कराल. आर्थिक उन्नती झाल्याने कार्यक्षमता वाढेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत “ऐकावे जनाचे, करावे मनाचे,’ हे धोरण ठेवा. बेकारांना कामाची सुसंधी मिळेल. महिलांना कौटुंबिक जीवनात सहजीवनाचा आनंद मिळेल; नवीन जागा, वास्तू, वाहनखरेदीचे योग.
कर्क : ग्रहमान अनुकूल
ग्रहमान अनुकूल असल्याने आर्थिकदृष्ट्या विशेष लाभ होईल. व्यवसायात विस्ताराचे बेत साकार होतील. पूर्वी केलेल्या कामातून पैसे मिळतील. अनपेक्षित लाभ होतील. नोकरीत प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल, सुविधा मिळतील. परदेशव्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. महिलांचा दिनक्रम धावपळ, दगदगीचा राहील; छंदात वेळ मजेत घालवतील. मुलांकडून चांगली बातमी कळेल.
सिंह : इच्छा सफल होतील
व्यवसाय-उद्योगात खेळत्या भांडवलाची सोय होईल. मनातील सुप्त इच्छा-आकांक्षा सफल होतील. कामातील उलाढाल वाढेल व फायद्याचे प्रमाणही वाढेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत तुमच्या कौशल्याला पुरेपूर वाव मिळेल. सहकारी व वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठराल. बेरोजगारांना काम मिळेल. महिलांचा वेळ घर सजावटीमध्ये जाईल.
कन्या : जोडधंद्यातून लाभ
आशा व निराशा या दोन्हींचा अनुभव येईल. आनंदाची बातमी नवीन आशा पल्लवीत करेल, तर एखादी घटना मन साशंक करेल. व्यवसायात कामाची योग्य आखणी करून कामे वेळेत संपवा. उधार-उसनवार टाळा. व्यवहारचातुर्यामुळे काही क्षेत्रांत उत्तम यश मिळेल. नोकरदार व्यक्तींनी तापट स्वभावावर आळा घालावा. जोडधंद्यातून विशेष फायदा होईल.
तुळ :नवीन गुंतवणूक फायदेशीर
व्यवसायात प्रगतीचा वेग उत्तम राहील. परिणामी, नवीन गुंतवणूक करणे गरजेचे होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. नवीन आवक वाढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. नोकरीत मनाप्रमाणे कामे केल्याचा आनंद मिळेल. परदेशव्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. नवदाम्पत्यांना अपत्यसुखाची चाहूल लागेल.
वृश्चिक : रोजगाराची संधी
आत्मविश्वासाने नवीन कामे हाती घ्याल. व्यवसायातील कार्यपद्धतीत बदल करून फायद्याचे प्रमाण वाढवाल. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल; बढती मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. बेकारांना कामधंदा मिळेल. महिलांचा वेळ छंदात मजेत जाईल. जीवाभावाची माणसे भेटल्याने आनंद मिळेल.
धनु : आर्थिक स्थिती सुधारेल
व्यवसायात व नोकरीत लवचिक धोरण ठेवाल. जशी कामाची गरज असेल, तसे कामाचे नियोजन कराल. व्यवसायातील तांत्रिक अडथळे दूर करून कामे वेळेत बिनचूक पूर्ण कराल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे कराल. कामानिमित्ताने सवलती मिळतील; त्याचा गैरफायदा मात्र घेऊ नका. छोटा प्रवास घडेल. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी.
मकर : चांगली बातमी कळेल
व्यवहारी धोरणांचा अवलंब करून व्यवसायात फायदा मिळवाल. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कामे हाती घ्याल व तडीस न्याल. जुनी येणी वसूल होतील. व्यापाऱ्यांना यशाचा काळ. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावे. वरिष्ठ महत्त्वाची कामे तुमच्यावर सोपवतील. अशक्य वाटणाऱ्या कामात यशश्री संपादन कराल. दगदग, धावपळ वाढेल. महिलांना मुलांच्या प्रगतीविषयी चांगली बातमी कळेल. घरात शुभकार्ये ठरतील.
कुंभ : उलाढाल वाढेल
या सप्ताहात तुमच्याबाबतीत “प्रयत्ने वाळूचे…’ ही म्हण सार्थ ठरेल. व्यवसायातील कार्यपद्धतीत बदल करून उलाढाल वाढवाल. जादा कामातून उत्पन्न मिळेल. हितचिंतकांची मदत होऊन कामे मिळतील. नोकरदार व्यक्तींना सहकारी व वरिष्ठांशी जमवून घ्यावे लागेल. कामानिमित्ताने दूरचे प्रवास व परदेशवारीही होईल. महिलांचा वेळ पाहुण्यांच्या तैनातीत जाईल. प्रियजन, आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील.
मीन : सुवार्ता कळेल
नशीब व प्रयत्न यांची सांगड घालून कामातील प्रगतीचा वेग वाढवाल. कामातील अडथळ्यांवर आत्मविश्वासाने मात कराल. व्यवसायात तुमच्या हौशी स्वभावाचा फायदा होईल. जितके जास्त काम कराल, तितकी जास्त कमाई कराल. आर्थिक मान उंचावेल. नोकरीत विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी संपर्क साधाल. विचारांची देवाणघेवाण होईल. महिलांचा कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा असेल. सुवार्ता कळेल.