पारगाव, (वार्ताहर)- पारगाव येथे श्री. संतराज महाराज पालखी सोहळ्यासाठी मानाचा अश्व ‘हिरा’ याची आमदार राहुल कुल यांचे हस्ते माऊली ताकवणे यांचे घरी विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी पालखी सोहळ्याच्या सेवेत दाखल करण्यात आला.
जुना अश्व थकल्यामुळे हा अश्व घेण्यात आला आहे. पंचकल्याण असा सर्वगुण संपन्न हा अश्व असून सहा महिन्यांपूर्वी सारंगखेडा येथून १६ महिने वयाचा हा घोडा सर्व खर्चासह तीन लाख छप्पन हजार रुपये किमतीला आणण्यात आला. हा घोडा पूर्ण वर्षभर सांभाळ करण्याचे काम पारगाव येथील माऊली ताकवणे हे करतात.
यावेळी आमदार राहुल कुल म्हणाले की, संतराज महाराज देवस्थानचा दर्जा “क ‘ मधून ” ब ‘ वर आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. संगमबेट हे सर्व बाजूंनी जोडले जाईल, अशी व्यवस्था आपण करीत आहोत. काही समस्या असल्यास त्या प्राधान्याने सोडविल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष गणेश जगदाळे, भीमा पाटस कारखान्याचे संचालक धनाजी शेळके, तुकाराम ताकवणे, पारगावचे माजी सरपंच सर्जेराव जेधे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल ताकवणे, संतराज महाराज पवार ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ. प. सुरेश महाराज साठे, उपाध्यक्ष संजय थोरात, सर्व विश्वस्त, भाविक आदी मान्यवर उपस्थित होते.