लंडन – आपल्या विरोधात केल्या गेलेल्या वर्णद्वेषी टिप्पणीमुळे आपण दुखावलो आणि संतापलो असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांनी म्हटले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान पत्रकारांशी बोलताना सुनक म्हणाले की, निगेल फराज यांच्या प्रचाराच्या वेळी रिफॉर्म यूकेचे कार्यकर्ते मला पाकी म्हणत होते आणि माझ्या मुली कृष्णा आणि अनुष्का यांनाही ते ऐकावे लागले. अशा गोष्टींचे दु:ख होते आणि संतापही येतो असे ४४ वर्षीय सुनक यांनी सांगितले.
ते म्हणाले की जेंव्हा तुम्ही रिफॉर्म पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांना पाहतात त्यावेळी तुमच्या लक्षात येते की ते अगदी सहजपणे वर्णद्वेषी, महिलांचा द्वेष करणारी भाषा आणि शब्द वापरतात. रिफॉर्म पक्षाच्या आत नेमकी कोणती संस्कृती आहे ती यातून दिसून येते.
ब्रिटनमधील विद्यमान सत्ताधारी कंझर्व्हेटीव्ह पक्षाला आव्हान निर्माण करण्यासाठी रिफॉर्म पार्टीने शंभरपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरवले आहे. इमिग्रेशनच्या विरोधात अत्यंत कडक भूमिका घेत त्यांनी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. दरम्यान, काही जणांनी केलेली विधाने आणि व्यक्त केलेल्या भावनांशी रिफॉर्म पार्टीचा संबंध नसल्याचे पक्षाचे नेते फराज यांनी म्हटले आहे.
ब्रिटनच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये ६५० जागा आहेत आणि यातील मोजक्याच ठिकाणी रिफॉर्मला विजय मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणांत आणि चाचण्यांमध्ये सुनक यांचा पक्ष पिछाडीवर असून लेबर पार्टीला जास्त जागा मिळत तो पक्ष सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.