नगर, (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील चवर सांगवी येथे महसूल पथकावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करेपर्यंत महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संघटनेच्या मागण्या मान्य केल्या आहेत.
त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवार (दि.१) कामावर हजर व्हावे, असे आवाहन महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आंधळे यांनी केले आहे.
चवर सांगवी (ता. श्रीगोंदे) येथे महसूल पथकावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करावी, गौण खनिजावर कारवाई करणाऱ्या पथकाला पोलिस संरक्षण द्यावे, किमान नायब तहसीलदार दर्जाचा अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडलाधिकारी, महसूल सहायक, अव्वल कारकून, शिपाई व कोतवाल कर्मचारी यांनी बुधवारपासून (दि.२६) आंदोलनात सहभागी होते.
जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी जिल्हा तलाठी संघटना, जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, पोलीस प्रशासनातील अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
चवर सांगवी गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले. अवैध गौणखनिज कारवाई करताना पथकामध्ये पथक प्रमुख म्हणून किमान नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी व २ शस्त्रधारी पोलीस व शासकीय वाहन, शासकीय वाहनचालक यांचा समावेश असावा, असे ही निर्देश दिले आहेत.
तलाठी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत हासे, सचिव महेश सुद्रिक, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आंधळे, अशोक मासाळ, दिगंबर कर्पे, सुभाष नेमाणे, आकाश कर्पे, संतोष तनपुरे, गिरिश गायकवाड, अक्षय फलके आदी उपस्थित होते.