MLC Election Result | लोकसभा निवडणुकींच्या निकालानंतर विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे 26 जून रोजी मतदान पार पडले. त्यानंतर आज 1 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे.
सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्यानंतर ही निवडणुक चुरशीची ठरली होती.
दिग्गज नेत्यांचे आज ठरणार भवितव्य
अनिल परब, किरण शेलार, निरंजन डावखरे यांसह अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतपेटीत बंद झाले होते, त्याचा फैसला आता होणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तसेच नाशिक व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका झाल्यानंतर सर्वांना उत्सुकता होती ती या निकालाची, अखेर आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. शिवसेनेच्या वतीने अनिल परब तर विरोधात भाजपचे किरण शेलार हे रिंगणात होते. मुंबई शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे प्रकाश सोनवणे यांनी माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजी नलावडे अशी लढत झाली. तसेच भाजपकडून शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीकडून सहकारी सुभाष मोरे, शिंदे गटाकडून शिवाजी शेंडगे यांना उमेदवारी घोषित केली होती.
तर नाशिक शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढतीचं चित्र आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनी माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाचे संदीप गुळवे हे उमेदवार असतील. तर त्यांच्याविरोधात अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे हे उमेदवार असतील.
मनसेने कोकण पदवीधरमधून उमेदवाराच्या नावाची घोषणा केल्यानंतर माघार घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा भाजपकडून निरंजन डावखरे यांना संधी देण्यात आली. येथे महाविकास आघाडीकडून रमेश कीर हे उमेदवार आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या दोन शिक्षक व दोन पदवीधर अशा एकूण 4 जागांची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. त्यानंतर आज विधान परिषदेच्या चार मतदार संघातील निकालाकडे सर्वांच लक्ष लागले आहे.
हेही वाचा:
सिलिंडरच्या किंमतीत तब्बल ३० रुपयांची घट ; वाचा तुमच्या शहरात एलपीजीचे दर कितीने झाले कमी ?