पिंपरी, (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर दोन भरती प्रक्रिया पुण्यात झाल्या. मात्र पहिल्यांदाच शहरात भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बुधवार (दि. 19) पासून इंद्रायणीनगर, भोसरी येथील मैदानावर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस भरतीमध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी 79 पदे, महिला 78 पदे, खेळाडू 15 पदे, प्रकल्पग्रस्त 14 पदे, भूकंपग्रस्त 4 पदे, माजी सैनिक 41 पदे, अंशकालीन पदवीधर 11 पदे, पोलीस पाल्य 7 पदे, गृहरक्षक दल 13 पदे, अनाथ 3 पदे भरली जाणार आहेत. भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून 1:10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
उमेदवारांनी लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. शारीरिक आणि लेखी चाचणी मधील गुणांच्या आधारे उमेदवारांची एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
भरती प्रक्रियेसाठी 396 पोलीस अधिकारी, अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. पावसामुळे एखादया दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर उमेदवारांना पुढील तारीख दिली जाईल. काही उमेदवारांना वेगवेगळया पदांकरीता एकापेक्षा जास्त ठिकाणी अणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल तर अशा उमेदवारांना दुसरी तारीख देण्यात येईल.
262 जागांसाठी 15 हजार अर्ज
शहर पोलीस दलातील 262 जागांसाठी 15 हजार 42 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यात दोन तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे. मैदानी चाचणीसाठी पहिल्या दिवशी 500, त्यानंतर दररोज 1200 उमेदवार आणि 5 जुलै रोजी 1620 उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे.
मैदानी चाचणी व शारिरिक मोजमाप हे संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल इंद्रायणी नगर या मैदानावर होणार असून याठिकाणी पिण्याचे पाणी, फिरते प्रसाधन गृह, खादयपदार्थाचे स्टॉल, वैदयकिय सुविधा, रुग्णवाहिका इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
पालखी सोहळ्यानिमित्त भरती प्रक्रियेस खंड
19 जून ते 10 जुलै या कालावधीत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरम्यान देहू-आळंदी येथील पालखी सोहळा 25 जून ते 30 जून या कालावधीत शहरात असल्याने या कालावधीत भरती प्रक्रिया खंडित असेल.
पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू याची खबरदारी घेतली असून डमी उमेदवार उपस्थित राहू नये यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. – सुनील रामानंद, पोलीस आयुक्त (प्रभारी)