पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागातील सक्षम अधिकार्याची स्वाक्षरी डावलून विविध उद्योग व्यवसायांना परवाने आणि ’ना हरकत’ प्रमाणपत्र देणार्या महिलेला हा प्रकार चांगलाच अंगलट आला आहे.
या महिला लिपिकाने विभागप्रमुख असलेल्या उपायुक्तांच्या बनावट सह्या मारून व्यवसाय परवाने दिल्याने संबंधित महिला कर्मचार्याची विभागीय चौकशी करून, सेवानिलंबित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राहूल अहिवाल यांनी दिले आहेत. अश्वमेघा वडागळे असे या महिला लिपिकाचे नाव आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आकाशचिन्ह व परवाना विभागात शहरातील छोटे – मोठे उद्योग, व्यवसाय परवाने दिले जातात. शहरातील पेट्रोल पंपासह व्यवसायांना साठा परवाना दिला जातो.
त्याशिवाय विविध भंगार व्यावसायिकांना देखील उद्योग-व्यवसाय परवाने दिले जात आहेत. त्यानुसार हजारो उद्योग व व्यावसायिकांना हे परवाने घेणे बंधनकारक आहे.
सदरचे उद्योग, व्यवसाय परवाने आणि ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी लिपिक असलेल्या अश्वमेघा वडागळे यांच्याकडे दिली होती. तत्कालिक सहाय्यक आयुक्तांनी त्या महिलेला उद्योग-व्यवसाय परवाना निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली होती.
त्यामुळे शहरातील विविध आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व उद्योग, व्यावसायिकांना परवाने, नूतनीकरण, ’ना हरकत’ प्रमाणपत्र हे संबंधित महिला लिपिकाकडून दिले जात होते.
संबंधिथ महिला कर्मचार्याने या अधिकाराचा गैरफायदा घेत शहरातील उद्योग व व्यवसाय परवाने, ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देताना आर्थिक तडजोडी करत त्यांनी थेट संबंधित विभाग प्रमुखांकडे सह्या न घेता स्वत:च उपायुक्तांच्या सह्या करत परवाने, ’ना हरकत’ दाखले देण्यास सुरुवात केली होती. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता.
या लिपिक महिलेने कुदळवाडीतील भंगार व्यावसायिकांना ’ना हरकत’ दाखले दिले होते. ही बाब उघडकीस आल्यानंतर या महिला कर्मचार्याची विभागीय चौकशी करून, तिला सेवा निलंबित करण्यात आले आहे.