दावडी, (वार्ताहर) – साबळेवाडी (ता.खेड) येथे त्रिमुर्ती सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली राजरोस वेश्याव्यवसाय,अश्लील नृत्ये,डीजे पार्टी,दारू विक्री सुरू आहे. याची तातडीने सखोल चौकशी होऊन गुन्हे दाखल करून परवाना रद्द करून कला केंद्र तातडीने बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल,
असा इशारा साबळेवाडीच्या श्री अंबिका देवस्थान ट्रस्टने दिला आहे. ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री, पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पो.स्टेशन यांना देण्यात आले आहे.
साबळेवाडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून त्रिमूर्ती कला केंद्र चालविले जाते. पूर्वी लावणी व इतर लोकनृत्ये सादर केली जात होती, परंतु गेल्या दोन वर्षांपासून राजरोस डीजे पार्टी,महिलांची अश्लील नृत्ये, दारू पार्टी एवढेच नाही तर,राजरोसपणे वेश्याव्यवसाय केला जात आहे.
साबळेवाडी येथे पवित्र असे प्रसिद्ध श्री अंबिकामातेचे मंदिर आहे. राज्यभरातून भाविक येत असतात संस्थेच्या वतीने देवस्थान विकास केला जात आहे. मात्र, गावात कला केंद्राच्या नावाखाली हे अवैध धंदे चालू असताना प्रशासन कारवाई करीत नाही ही खेदाची बाब आहे. औद्योगिकीकरणामुळे पुणे,पिंपरी चिचवड,चाकणमधीलच नव्हे तर स्थानिक तरूण,उद्योजक कला केंद्राच्या विळख्यात अडकले आहेत.
शाळा- महाविद्यालयातील अल्पवयीन मुलांनाही याचे वेड लागल्याने ग्रामस्थ चिंतित आहे. शासनाने कला केंद्राला परवानगी कशासाठी दिली आहे व तेथे काय गैरकृत्ये केली जातात याची तपासणी होते का ? कला केद्र चालक याचे शासनदरबारी लागेबांधे असल्यामुळे कोणतीही कारवाई केली जात नाही.
साबळेवाडीसारख्या ग्रामीण भागामध्ये राजरोस वेश्याव्यवसाय सुरू आहे. डीजे पार्टीत दारूचा बेसुमार वापर केला जातो.कोणताही विक्री परवाना नाही,शासनाचे लेडीजबार विरोधात तातडीने कारवाईचे धोरण असताना येथे मात्र खुलेआम सर्वकाही चालू आहे.
तरी तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी होऊन कारवाई केली जावी परवाना रद्द करून गुन्हे दाखल करावेत व त्रिमुर्ती कला केंद्र कायमस्वरूपी बंद करावे अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीच्या ठरावाकडे दुर्लक्ष
साबळेवाडी ग्रामपंचायतीने ठराव करून सदर प्रकार बंद करण्याबाबत कळवूनही दखल घेतली नाही. पोलीस व आम्ही बघून घेऊ,ग्रामपंचायतीला काही अधिकार नाही, अशी दमदाटीची भाषा केंद्रचालकाने वापरली.