नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ही घोषणा केली आहे. राहुल गांधी हे रायबरेलीचे खासदार आहेत. 2014 आणि 2019 मध्ये संख्याबळाच्या अभावामुळे लोकसभेला विरोधी पक्ष नेता मिळाला नव्हता.
राज्यसभेमध्ये काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष असणारे मल्लिकार्जुन खरगे हे विरोधी पक्ष नेते होते मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 290 जागांवर इंडिया आघाडीला विजय मिळाला असून आता राहुल गांधी हे देशाचे लोकसभेचे नवे विरोधी पक्ष नेते असणार आहे.
लोकसभेत कोणत्या पक्षाचे किती संख्याबळ
भाजप 240 खासदार आहेत. चंद्राबाबूंच्या टीडीपीचे 16 खासदार . नितीश कुमारांच्या जेडीयूचे 12 खासदार, शिंदेंच्या शिवसेनेचे 7 खासदार, एलजेपीचे 5 खासदार आहेत आणि इतर छोटे पक्ष 13 खासदार. त्यामुळे NDAचं संख्याबळ 293 खासदारांचं आहे.
इंडिया आघाडीचं संख्याबळ पाहिलं तर काँग्रेसचे 99 आणि सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांनीही काँग्रेसला पाठींबा दिलाय म्हणजेच काँग्रेसचे 100 खासदार. अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीचे 37 खासदार, ममतांच्या तृणमूल काँग्रेसचे 29, एम.के. स्टॅलिन यांच्या डीएमकेचे 22 खासदार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार, आरजेडीचे 4 खासदार आणि इतर छोटे पक्षांचे 26 खासदार, अशी एकूण बेरीज होते 235 खासदार.