Parliament Session – वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेतील घोळांवरून शुक्रवारी लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. त्यामुळे संसदेचे कामकाज ठप्प झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गुरूवारी संसदेत अभिभाषण झाले. त्यावरील आभारदर्शक ठरावावर शुक्रवारपासून चर्चा करण्यास दोन्ही सभागृहे सज्ज झाली.
मात्र, विरोधकांनी नीटमधील घोळांवर चर्चेचा आग्रह धरला. त्यामुळे दोन्ही सभागृहांत गदारोळाचे चित्र पाहावयास मिळाले. लोकसभेत सभापती ओम बिर्ला आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी आभारदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान नीटविषयी चर्चा करता येऊ शकेल, अशी भूमिका मांडली.
मात्र, विरोधकांनी इतर सर्व कामकाज स्थगित करून नीटविषयी स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याचा आग्रह धरला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट हा संपूर्ण देशासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा असल्याने त्यावर चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र, विरोधकांची मागणी सभापतींनी स्वीकारली नाही. त्यामुळे विरोधकांनी घोषणाबाजी करत सभापतींसमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली. गदारोळाचे चित्र कायम राहिल्याने लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
लोकसभेसारखेच चित्र राज्यसभेतही पाहावयास मिळाले. विरोधक राज्यसभेत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत दाखल झाले. त्यामध्ये विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचाही समावेश असल्याबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रदीर्घ संसदीय अनुभव असणाऱ्या खर्गे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची कृती वेदनादायी आणि अविश्वसनीय असल्याची टिप्पणी त्यांनी केली. राज्यसभेचे कामकाजही गदारोळामुळे वारंवार तहकूब करण्याची वेळ आली. त्यातून नीट घोळांवरून संसदेतील वातावरण तापणार असल्याचे सूचित झाले.