पुणे, [प्रभात वृत्तसेवा} – पुणे शहराचा लौकिक आणि प्रतिष्ठा कायम राहावी, शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी ही ओळख आणखी समृद्ध करण्यासाठी पुणे पोलीस कायम प्रयत्नशील राहतील. आपल्या सुसंस्कृत शहराला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींना हद्दपार करण्यासाठी पुणे पोलीस सक्षम असल्याची ग्वाही पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत निर्भय विद्यार्थी अभियान यांच्या वतीने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त येरवडा येथील गेनबा मोझे प्रशालेत आयोजित व्यसनमुक्ती सप्ताहच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस आयुक्त बोलत होते.
या कार्यक्रमाला मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख डॉ. मुक्ता पुणतांबेकर, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके,
मोजे प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्यासह निर्भय विद्यार्थी अभियानाचे सदस्य, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासह विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अमितेश कुमार म्हणाले की, जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या दिवशी केवळ व्यसनमुक्तीची शपथ घेऊन चालणार नाही. त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेऊन व्यसनमुक्तीसाठी प्रत्यक्ष काम केले पाहिजे.
शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनामुळे गुन्हेगारी वाढत आहे. त्यामध्ये अल्पवयीन बालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
ही मोठी सामाजिक समस्या रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईसह सामाजिक संस्थांच्या मदतीने आगामी काळात आम्ही ठोस उपाययोजना करणार आहोत. शाळा महाविद्यालयांसोबतच वस्ती पातळीवर व्यसनमुक्तीसाठी अभियान राबवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ.मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या की, एन्जॉयच्या तसेच मानसिक ताण घालविण्यासाठी तरुणांकडून व्यसन केली जातात. याच व्यसनांमुळे भविष्यात आरोग्याचे इतर त्रास व मानसिक आजार होतात. कोणाच्याही सांगण्यावरून मुलांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये.
माजी आमदार व मोझे प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे यांनी देखील पुणे पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. मोझे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती अभियानासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.