पुणे – दसऱ्याच्या निमित्ताने महापालिकेच्या मुख्य इमारतीत अनेक विभाग प्रमुख कार्यालये चक्क प्लॅस्टिकच्या फुलांनी सजविण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हीच महापालिका गणेशोत्सवाच्या काळात थर्माकोल आणि प्लॅस्टिक साहित्यावर कारवाई करते. मात्र, आता महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्येच नियम तुडवले जात असल्याने कोणावर कारवाई करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सजावटीसाठी प्लॅस्टिक फुलांचा वापर केला जातो. हे प्लॅस्टिक पर्यावरणासाठी घातक असल्याने ती वापरू नयेत, यासाठी जनजागृती केली जाते. तसेच, फूल उत्पादक शेतकरीदेखील याबाबत तक्रारी करतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या प्लॅस्टिक फुलांचा वापर बेसुमार वाढल्याने शेतकऱ्यांना फटकाही बसला आहे. मात्र, त्याचवेळी अशा प्लॅस्टिकवर कारवाईची जबाबदारी असलेल्या महापालिकेतही या फुलांच्या माळा, तोरणे वापरली जात आहेत.
“100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सिंगल युज प्लॅस्टिकला केंद्रशासनाने बंदी घातलेली आहे. ही फुले याच गटात येतात. त्यांचे विघटन होत नाही. महापालिकेने त्यावर कारवाई करणेच अपेक्षित आहे. मात्र, महापालिकाच अशी फुलं वापरत आहे. या फुलांमुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमार ओढावली आहे.” – सचिन पुणेकर, पर्यावरण तज्ज्ञ