पुणे– चिकन, मटन आणि पोर्कची दुकाने आहेत मांस विक्री केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या चिकन, मटन वेस्टचे संकलन करून त्यावर प्रकिया करणारा एकही प्रकल्प महापालिकेकडे नाही. त्यामुळे पालिकेकडून या कचऱ्यावर प्रकिया करण्यासाठी उरूळी देवाची येथील कचरा डेपोच्या जागेत चिकन व मटन वेस्ट प्रकिया प्रकल्प उभारला जाणार आहे.
सध्या, अशा कचऱ्याचे संकलनही होत नसल्याने हे व्यावसायिक हा कचरा नाले, चेंबर, ओढ्यात तसेच टेकडयांवर अथवा उघड्यावर टाकतात. परिणामी, सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने महापालिकेकडून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी यातील कोणताही कचरा जाळला जाणार नाही तसेच हा प्रकल्प पूर्णत: धूर विरहित असणार आहे.
जागे अभावी रखडला प्रकल्प…
केंद्रशासनाच्या स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणातही पुणे महापालिकेस अनेकदा मटण वेस्टचा प्रकल्प उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, या प्रकल्पास विरोध होत असल्याने महापालिकेकडे त्यासाठी जागाच नाही. या प्रकल्पासाठी महापालिकेस २० गुंठे जागेची आवश्यकता असून प्रकल्पाच्या जागेच्या परिसरात २०० मीटर बफर झोन असणे आवश्यक आहे, अशी जागा महापालिकेकडे केवळ उरूळी देवाची येथील कचरा डेपो मध्येच असल्याने पालिकेकडून कचरा डेपोच्या परिसरात हा प्रकल्प उभा करण्याचे नियोजन सुरू आहे.
कारकस प्रकल्पही सुरू होणार…
महापालिकेकडून पाच ते सहा वर्षांपूर्वी मुंढवा येथील महापालिकेच्या जागेत मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे तीन कोटी रूपये खर्चून कारकस प्रकल्प उभारण्यात आला होता. मात्र, या प्रकल्पास विरोध झाल्याने तसेच काही नागरिक न्यायालयात गेल्याने हा प्रकल्प बंद होता. मात्र, एनजीटीने त्यावरील स्थगिती उठविली असल्याने पुढील महिनाभरात हा प्रकल्पही सुरू केला जाणार असून एक टन क्षमतेचा हा प्रकल्प आहे.