पुणे: वारकऱ्यांना घेऊन निघालेला टेम्पो उलटल्याची घटना कात्रज -कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात रविवारी रात्री घडली. अपघातात २० वारकऱ्यांना दुखापत झाली असून, याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला
याबाबत प्रयागबाई नारायण बोखारे ( ७२, रा. फुकटगाव, जि. परभणी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टेम्पोचालक नवनाथ लक्ष्मणराव चाेपडे (रा. धार, जि. परभणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या परभणी जिल्ह्यातील वारकऱ्यांना घेऊन टेम्पो रविवारी (३० जून) रात्री मुक्कामी निघाला होता. मात्र कात्रज – कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात गल्ली क्रमांक एक येथे टेम्पोचालक चोपडे याचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो उलटला. यात टेम्पोतील २० वारकऱ्यांना दुखापत झाली.