येणे सोसे मन झाले हावभरी,
परत माघारी येत नाही । बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल,
करावा विठ्ठल जीवभाव ।।
असे म्हणत वैष्णवांची सेवा म्हणजेच जणू विठ्ठलाचीच सेवा करत आहोत असा भक्तीभाव पालखी मुक्कामी नि:स्वार्थ सेवेतून दिसून आला. विठुरायाला भेटण्याची आस मनी बाळगून राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपुरी पायी निघाले आहेत. या वारकऱ्यांच्या न्याहरी, चहापान, भोजनासह केशकर्तन-दाढी करण्यासह आरोग्य तपासणी, हात-पाय दाबून देणारी मालिश, कपडे ठेवण्याच्या पिशव्यांची शिलाई, छत्री आणि पादत्राणांची दुरुस्ती असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून पुण्यातील काही स्वयंसेवी संस्था, संघटना, व्यापारी, वैयक्तिक नागरिक, गृहनिर्माण सोसायटी यांनी पाहुणचार केला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आयोजित नेत्र आणि आरोग्य तपासणी शिबिरात १२ हजारांहून अधिक वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली. २५ हजार वारकऱ्यांना न्याहरी आणि चहा देण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, रंगीलदास सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्ट आणि आचार्य आनंदऋषीजी ब्लड बँक यांच्या वतीने वारीत सहभागी झालेल्या चार हजार वारकऱ्यांची डोळे तपासणी करून त्यांना मोफत चष्मेवाटप करण्यात आले.
विश्वास आधार स्वयंरोजगार संस्था आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने आरोग्यदायी वारीसाठी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते औषध पेटी वाटप करण्यात आले. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात आयोजित आरोग्य तपासणी शिबिरामध्ये दीड हजारांहून अधिक वारकऱ्यांची रक्तदाब, उच्च शर्करा यांसोबतच पायदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारख्या प्राथमिक आजारांची तपासणी शिबीरात करण्यात आली.
रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट,लायन्स क्लब सहकारनगर, लायन्स क्लब ऑफ बिबवेवाडी आणि राहतेकर वूमन कॅन्सर डायग्नॉस्टिक सेंटर यांच्यातर्फे वारकरी महिलांची मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली. वारकरी मंडळींचा मुक्काम असलेल्या मार्केट यार्ड येथील गुळभुसार विभागातील दुकानांमध्ये १५ हजार वारकऱ्यांना चहा, अल्पोपहार, भोजन यांसह निवास आणि स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून सेवा करण्यात आली.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि पुणे पीपल्स को-ऑप. बँकेतर्फे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आयोजित सलग बारा तासांच्या अखंड कीर्तनमालेमध्ये श्रेयस बडवे, शेखर व्यास, संज्योत केतकर, प्रा. संगीता मावळे, रेशीम खेडकर, विकास दिग्रसकर, चिन्मय देशपांडे आणि वासुदेव बुरसे यांचे कीर्तन झाले.
मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक, रिझवानी मस्जिद ट्रस्ट, सुफी वारकरी विचारमंच आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर यांच्या वतीने सोमवारी सकाळी काढण्यात आलेल्या सर्वधर्मीय दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. साखळीपीर तालीम येथून सुरू झालेली या दिंडीचा गंज पेठेतील रिझवानी मस्जिद येथे समारोप झाला. सहभागी वारकऱ्यांना व्हेज बिर्याणी, शीरखुर्मा वाटप तसेच रेनकोट वाटप करण्यात आले.