पुणे – पोलीस भरती 2022-23ची असल्याने वयोमर्यादा त्याच पद्धतीने लागू करावी. बऱ्याच ठिकाणी पावसामुळे चिखलात मैदानी चाचणी घेण्यात आली, ती रद्द करावी या मागणीसाठी पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय चौकात जवळपास तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल शिरसाट, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन, उपाध्यक्ष स्वप्निल नाईक, प्रथमेश आबनावे, पुणे शहर युवक सरचिटणीस सुजित गोसावी, अजित ठोकळे, आशुतोष जाधवराव, मुरली बुधारम, ऋनेश कांबळे, विखार शेख, आनंद आगरवाल, श्रीनिवास गुट्टे, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.
रवींद्र धंगेकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मागणी सोबत आम्ही आहोत. याच्यात सरकारने योग्य ते निर्णय घेऊन विद्यार्थी व युवकांना न्याय द्यावा. आम्ही विद्यार्थ्यांसोबत शेवटपर्यंत या लढ्यात सहभागी आहोत. आता, तीन महिन्यांवर विधानसभा आल्या असल्याने आम्ही काहीतरी भरती केली हे दाखवण्याच्या प्रयत्नात लाखो परीक्षार्थीच्या भविष्याशी खेळ होत आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करुन राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे.