पुणे – गंगाधाम रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी मार्केट यार्ड भागातील गंगाधाम चौक ते शत्रूंजय मंदिर रस्ता दरम्यान ट्रक, ट्रेलर, डंपर अशा जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील कान्हा हाॅटेल (शत्रूंजय मंदिर) ते गंगाधाम चौक, कोंढवा भागातील टिळेकरनगर ते गंगाधाम चौक या रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी ट्रक, डंपर, सिमेंट वाहतूक करणारे मिक्सर, कंटेनर, ट्रेलर अशा जड वाहनांना सकाळी सात ते रात्री दहा या वेळेत बंदी घालण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पाेलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिले. या आदेशाबाबत नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त, येरवडा येेथील कार्यालयात तक्रार द्यावी, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.
गंगाधाम रस्त्यावर १२ जून रोजी डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी दमयंती भूपेंद्र सोळंखी यांचा मृत्यू झाला होता. प्रियंका राहुल सोळंखी जखमी झाल्या होत्या. गंगाधाम रस्त्यावर गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यासाठी बांधकाम साहित्य घेऊन येणारे ट्रक, डंपर भरधाव वेगाने जातात. अवजड वाहनांमुळे या रस्त्यावर यापूर्वी अपघात झाले आहेत. त्यामुळे या भागात अवजड वाहतुकीवर बंदी घालावी, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. यासंदर्भात आंदोलनही केले होते. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी हे आदेश दिले आहेत.