वाघोली (प्रतिनिधी) : भरारी पथकाकडून होत असलेली कारवाई थांबली आणि शासकीय यंत्रणेसोबत झालेल्या चर्चेदरम्यान अंशतः मागण्या मान्य करून अंशत: मागण्याचं धोरण तयार करण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाने पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे.
वाघोली येथे रविवारी (दि.३०) सायंकाळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. भरारी पथकाकडून ड्रोनद्वारे खाणींची होत असलेली मोजणी व होत असलेल्या कारवाई विरोधात तसेच शासन स्तरावर रखडलेले खाणपट्टा नूतनीकरण, रॉयल्टी दर कमी करणे अशा विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाने मागील दहा दिवसांपासून बेमुदत संप पुकारला होता.
यामुळे खडीचा पुरवठा ठप्प झाला होता तर खडी मशीन्स बंद झाल्या असल्याने खडी व क्रशसँडचा तुटवडा जाणवत होता. संपादरम्यान भरारी पथकाची कारवाई थंड झाली तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी सुहास दिवसे,
आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत बंद व शासकीय मागण्यासंदर्भामध्ये चर्चा झाल्यानंतर अंशतः मागण्या मान्य करून अंशत: मागण्याचं धोरण तयार करण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे सदरचा संप वाघोली येथील पदाधिकारी, सभासदांच्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला. डंपरची वाहतूक व खडी मशीनची धडधड पुन्हा सुरु झाली आहे.