पुणे – लोहियानगर भागात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पदाधिकार्यावर पालघन व कोयत्याने हल्ला करत त्याचा अंगठाच तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांना चार सराईतांसह नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सलमान उर्फ बल्ली नासीर शेख (३१, रा. लोहीयानगर सध्या रा. सबेरा पार्क, कोंढवा), युसुफ उर्फ अतुल फिरोज खान (२४, रा. लोहीयानगर), सुलतान चाँद शेख (२६, रा. लोहीयानग, गंजपेठ), असिफ उर्फ मेंढा इक्बाल सय्यद (३६, तिघेही रा. लोहीयानगर) आणि असलम पटेल यांच्यासह नऊजणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह अॅट्रॉसिटीच्या विविध अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अक्षयचा भाऊ नागेश ढावरे याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय दत्ता ढावरे (रा. लोहियानगर, गंज पेठ) यांचा अंगठा तोडण्यात आला. ढावरे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे कसबा मतदार संघाचे उपाध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते आहेत. आरोपी आणि अक्षय लोहियानगर परिसरात राहायला आहेत.
रविवारी रात्री आठच्या सुमारास अक्षय आणि त्यांचे मित्र शंकरशेठ रस्ता परिसरातील एकबोटे कॉलनीतील एका हॉटेलवर चहा पित होते. त्यावेळी दुचाकींवरून आरोपी आले. ‘लोहियानगरमें मसीहा बन रहा है, आज इसको मारने का ’ असे म्हणून आरोपींनी अक्षय यांना जातीवाचक शिवीगाळ केली.
त्यांच्यावर कोयता आणि पालघनने हल्ला करत ढावरे यांचा अंगठा तोडला. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त मच्छिंद्र खाडे करीत आहेत.