– नीलकंठ मोहिते (प्रतिनिधी)
इंदापूर – विद्यार्थ्यांचे आयुष्यात ध्येय काय असले पाहिजे, काय करायचे आहे, हे आपण पक्के ठरवले पाहिजे, आपल्या आवडीच्या क्षेत्रात गेले पाहिजे, खरंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आपण घेतलेला ट्रेड याचे ज्ञान आगामी काळात पुरेपूर वापरले पाहिजे. यातूनच आपल्या जीवनाला वेगळी कलाटणी दिली पाहिजे. असे आवाहन माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले. इंदापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मेळाव्याचे उद्घाटन राज्यांचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुक्रवार (ता.21 जून) रोजी पार पडले.
यावेळी इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी यु.के.सूर्यवंशी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सिद्धार्थ नामपल्ले, आनंद कामोजी, बाळासाहेब ढवळे, पोपट शिंदे, जयकुमार शिंदे, प्रशांत होळकर, संस्थेचे प्राचार्य नितीन माने, उपप्राचार्य झणझणे.एस.एस. यांच्यासह शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते.
पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, कोणताही व्यवसाय करण्यासाठी मनापासून मेहनत घेतली पाहिजे कोणीही आईच्या पोटातून कोणताही व्यवसाय शिकून येत नाही. त्यामुळे नीसंकोच इच्छाशक्ती महत्त्वाची असते. इच्छाशक्ती प्रबळ ठेवली तर मार्ग सापडतात हे विद्यार्थ्यांनी विसरू नये, हे मी करणार हे मी होणार याची खूणगाट मनाशी बांधा असाही सल्ला विद्यार्थ्यांना आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिला.
आयटीआय मध्ये मोठ्या घरातील मुले येत नाहीत गोरगरिबांच्या कुटुंबातील मुले येतात. यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी जी मदत लागेल ती तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून देण्यास तयार आहे. आपल्या आई-वडिलांना आधार देण्याची भूमिका हेच विद्यार्थी आगामी काळात करतात. असाही विश्वास आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.