पुणे – भारताने टी-२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यानंतर जल्लोष करणाऱ्या नागरिकांना धमकाविणाऱ्या तोतया पोलिसाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून महाराष्ट्र पोलिसांचे बनावट ओळखपत्र, केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलाचे ओळखपत्र, तसेच पोलिसांचा गणवेश जप्त करण्यात आला आहे.
सुमंत किशोर पार्टे (व२२, सध्या रा. शोभा टाॅवर, पूना हाॅस्पिटलजवळ, नवी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई राहुल सोनार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी मध्यरात्री भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळविल्यानंतर शहरातील वेगवेगळ्या भागात जल्लोश करण्यात आला. अलका चित्रपटगृहाजवळ मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास काही तरुण जल्लोष करत होते. त्यावेळी खाकी रंगाची पॅँट परिधान केलेल्या सुमंत पार्टे याने दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणांना धमकावून मारहाण केली.