40 शेतकर्यांच्या पंपांच्या केबल चोरीला
जुन्नर – शहरालगतच्या पाडळी कबाडवाडी येथील सुमारे 40 शेतकर्यांच्या कृषिपंपांच्या महागड्या केबल वायर चोरट्यांनी चोरून नेलेल्या असून या आधीही अशाच प्रकारे केबल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पाडळी कबाडवाडी येथील शरद कबाडी, अरुण पापडे, नवनाथ कबाडी, राजेंद्र पापडे, तान्हाजी ठोसर, प्रताप गोरे, महेंद्र बुट्टे, संतोष कबाडी आदींसह अनेक शेतकर्यांच्या शेतामधील महागड्या केबल वायर चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या भागातील अनेक शेतकर्यांच्या कुकडी नदी किनारी शेती करता लागणार्या वीज मोटारी बसविण्यात आले आहेत.
या पंपांच्या केबल वायरची वारंवार चोरी होत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी या भागातील सुमारे 40 शेतकर्यांच्या शेती पंपांच्या केबल वायर चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. पाडळी कबाडवाडीचे अनेक शेतकर्यांनी पोलीस ठाण्यात येऊन वारंवार होत असलेल्या केबल चोरीच्या घटनांबाबत संताप व्यक्त करीत काही संशयितांची नावे पोलिसांना दिली
असून याबाबत ची ठोस कायदेशीर कारवाई तातडीने करण्याची मागणी उपसरपंच संतोष केदारी, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण पापडे यांनी केलेली आहे. जुन्नर परिसरातील अनेक गावातील शेतकर्यांच्या मोटारींची केबल वायर चोरीच्या घटना वाढत असून केबल चोरी करणारी टोळीच सध्या कार्यरत आहे.