पारगाव येथील दिव्यांग दयानंद ढोबळेंनी घेतले विक्रमी उत्पादन
लक्ष्मण ढोबळे
पारगाव शिंगवे – शेती व्यवसायात आता सुशिक्षित बेरोजगार तरुण आधुनिक पद्धतीने शेती करून विक्रमी पिकांचे उत्पादन घेत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील दिव्यांग दयानंद ज्ञानेश्वर ढोबळे. त्यांनी 17 गुंठे क्षेत्रात भेंडीचे यशस्वी उत्पादन घेतले असून यातून दीड ते दोन लाखांचा निव्वळ नफा येण्याची आशा त्यांना आहे.
पारगाव येथील ढोबळे मळ्यात दयानंद ज्ञानेश्वर ढोबळे या 26 वर्षीय तरुणाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत एका हाताने शेती करीत यशस्वीही केली आहे. तरकारी पिकांना चांगले बाजारभाव मिळत असल्याने त्याने भेंडीचे पीक घेण्याचे ठरवले. जमिनीची मशागत करून दीड महिन्यांपूर्वी 17 गुंठे क्षेत्रात गादी वाफे तयार करून त्यावर मल्चिंग पेपर अंथरून भेंडीचे बी टाकले पाण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केला. दीड महिन्यानंतर भेंडीच्या उत्पादनाला सुरुवात झाली.
प्रति किलो 35 ते 40 रुपये
भेंडीलाही सध्या प्रती किलोला 35 ते 40 रुपये बाजारभाव मिळत आहे. एका तोड्याला 100 ते 120 किलो भेंडी निघत आहे. एक दिवसाआड भेंडीची तोडणी होत आहे. दोन महिने भेंडीचे उत्पादन सुरू राहणार आहे. दयानंदला भेंडीचे उत्पादन घेण्यासाठी त्याचे वडील ज्ञानेश्वर नाना ढोबळे व आई निर्मला मदत करत आहे. भेंडीला चांगला बाजारभाव मिळत राहिल्यास अंदाजे दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल असे, दयानंद ढोबळे यांनी सांंगितले.
17 गुंठे भेंडीसाठी आलेला खर्च
जमिनीची मशागत बियाणे, मल्चिंग पेपर, ठिबक, खते, औषधे, मजुरी असा एकूण 45 हजार रुपये खर्च आला आहे. हा खर्च जावून अंदाजे पावणे दोन ते दोन लाखांचा निव्वळ नफा हाती येण्याची आशा दयानंद ढोबळे यांनी व्यक्त केली.