पुणे – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल एक किलो सोने (१०८८.३ ग्रॅम) जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. दुबईमधून आलेल्या एका प्रवाशाने त्याच्या सीटखालील पाईपमध्ये सोने लपवले होते.
कस्टम विभागाला याची माहिती मिळाल्यावर अगोदर प्रवाशाची झाडाझडती घेण्यात आली. त्याच्याकडे काहीच मिळाले नाही. मात्र त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने तो बसलेले सीट तपासण्यात आले. तेव्हा लिक्वीड स्वरुपात हे सोने एका प्लॅस्टीकच्या ट्युबमध्ये पाईपमध्ये लपवले गेले होते.
दुबईतून आलेल्या विमानातून सोने तस्करी होत असल्याची खबर कस्टम विभागाला मिळाली होती. प्रवाशाची झाडाझडती घेतल्यावर काहीच न मिळाल्याने अधिकारीही गोंधळले होते. मात्र त्याने सोनं आणल्याची खात्रीशीर माहिती होती.
यामुळे तो बसलेल्या सीटखाली तपासणी करण्यात आली. तेव्हा सोन्याचे पाकिट सापडले. संबंधीत प्रवाशाची तपासणी करण्यात येत आहे. या सोन्याची किंमत ७८ लाख इतकी आहे.