पुणे – शहरात मागील दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली. शनिवारी (दि. 22) सकाळपासून ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला. वडगावशेरी येथे सर्वाधिक 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या 24 तासांत तीन ते चार अंशांनी कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून येते.
आठ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दोन दिवसांपूर्वी शहरासह जिल्ह्यात झालेल्या पावसाने पुणेकरांसह शेतकऱ्यांना दिलासा दिला. जून महिन्यातील रिमझिम पावसाला सुरुवात झाली असे वाटत असताना, दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली. एक दिवसाआड तरी पाऊस पडेल अशी शक्यता असताना, आज शहरासह जिल्ह्यातून पाऊस गायब झाला. त्यामुळे दिवसभरात अधून-मधून उन्हाचा चटका आणि ढगाळ वातावरण असल्याने उकाडा चांगलाच वाढला होता.
पुढील दोन दिवस शहरात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. तर आज वडगावशेरी पाठोपाठ मगरपट्टा येथे 34.3, हवेली-33.6, कोरेगांव पार्क- 33.4, शिवाजीनगर-32.6, एनडीए येथे 32.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.