पुणे – संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यात विसावला आहे. या दोन्ही पालख्यांचे प्रस्थान दि. 2 जुलै रोजी सकाळी पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होईल. त्यामुळे या मार्गावरील बसचे नियोजन बदलण्यात आले आहे.
त्यामध्ये महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी या ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था आहे, तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा व्यवस्था करण्यात आली आहे.
पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर आणि सासवड रोडने मार्गस्थ होईल. या वेळी सोलापूर/उरूळीकांचन मार्ग जसजसा वाहतुकीसाठी खुला होईल, तसतशी बस वाहतूक सुरू ठेवण्यात येईल. हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पूर्णत: बंद राहणार आहे.
त्यामुळे प्रवासी/भाविकांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी म्हणून सदर मार्गांची बस वाहतूक पर्यायी मार्गाने म्हणजेच दिवेघाटऐवजी बोपदेव घाटमार्गे चालू ठेवण्यात येणार आहे. या बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून, त्यासाठी ६० जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.