पुणे – लोकसभा निवडणुकीत ओबीसी-मराठा वादात जातीय समीकरणांचा फटका पक्षाला बसला, या निष्कर्षापर्यंत आलेल्या भाजपने आता विधानपरिषदेच्या जागांवर ओबीसी उमेदवारांना संधी देत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. पुण्यातही भाजपने त्याच धर्तीवर हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना पुन्हा आमदारकीची संधी दिली आहे.
टिळेकर यांच्या उमेदवारीमुळे विधानसभा निवडणुकीचा पुण्यातील जागा वाटपाचा तिढाही भाजपने सोडवला आहे. ही जागा आता विद्यमान आमदार असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे कायम ठेवण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. टिळेकर हे २०१४ मध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांनी टिळेकर यांचा पराभव केला. तर टिळेकर यांच्याकडे पक्षाने ओबीसी मोर्चाचे अध्यक्षपदही दिले होते.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला जागा गमवाव्या लागल्या. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीवरही त्याचे परिणाम होण्याची शक्यता होती. विशेषत: पुण्यात आठ जागांमध्ये भाजपच्या ५, तर राष्ट्रवादीकडे २ जागा असून एका ठिकाणी काॅंग्रेसचा आमदार आहे. त्यामुळे भाजपला पुण्यात सहा आणि राष्ट्रवादीला २ जागा दिल्या जाणार होत्या.
मात्र, राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांनी मागील निवडणुकीत भाजपच्याच आमदारांचा पराभव केला होता. त्यामुळे पराभव झालेले आमदार पुन्हा विधानसभेसाठी इच्छूक होते. त्यांच्याकडून पक्षाकडे तयारी करण्यात येत असल्याचेही सांगण्यात येत होते. त्यामुळे विधानसभेला जागा वाटपात हडपसर आणि वडगावशेरी हे कळीचे मुद्दे ठरणार होते.
ही बाब लक्षात घेता आता टिळेकर यांना भाजपने परिषदेवर संधी दिल्याने हडपसरची जागा राष्ट्रवादीकडे कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, वडगावशेरीत विद्यमान आमदार राष्ट्रवादीचाच असल्याने भाजप आणि राष्ट्रवादीचा विधानसभेचा पुण्यातील तिढा जवळपास संपला आहे. मात्र, शिवसेनाही हडपसरची मागणी करत असल्याने हे दोन्ही पक्ष काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
पुण्यावर भाजपची मेहरनजर
पुणे शहर भाजपसाठी महत्त्वाचे असल्याचे टिळेकर यांच्या उमेदवारीने पुन्हा एकद सिद्ध झाले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने पुण्यात प्रा. मेधा कुलकर्णी यांना थेट राज्यसभेत पाठवले. त्यानंतर पुण्यातून खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात राज्यमंत्रीपद देण्यात आले. तर आता योगेश टिळेकर यांना विधान परिषद देत भाजपने पुण्यावर मेहरनजर केली आहे.