पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेकडून मिळकतकराची ४० टक्के सवलत कायम ठेवण्यासाठी शहरातील ३ लाख ७२ हजार मिळकतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी ३५० कर्मचाऱ्यांचे पथक महापालिकेकडून नेमण्यात आले आहे. १५ आॅगस्ट पर्यंत हे पथक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहे. मात्र, मिळकतींची संख्या मोठी असल्याने पालिकेकडून सोसाय़टीची मदत घेतली जाणार आहे.
शहरातील बहुतांश सोसायट्यांकडे संबंधित मिळकतीत मूळ मालक अथवा भाडेकरू राहतो याची नोंद असते या नोंदीचा आधार पालिकेकडून घेतला जाणार असल्यचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी सांगितले.
महापालिकेकडून १९७० पासून निवासी मिळकतीला दिली जाणारी ४० टक्के सवलत शासनाच्या आदेशानुसार पालिकेने मागील आर्थिक वर्षापासून पुन्हा देण्यास सुरूवत केली आहे. ही सवलत पूर्ववत करण्यासाठी महापालिकेने या मिळकतधारकांकडून पीटी-३ अर्ज भरून घेतले. मात्र, याला केवळ ६७ हजार मिळकतधारकांनीच प्रतिसाद दिल्याने प्रशासनाने उर्वरीत मिळकतधारकांना शंभर टक्के आकारणी सुरू केली. यामुळे मिळकतधारकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने ४०टक्के सवलतींपासून वंचित असलेल्या मिळकतींना सवलत देण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यासाठी साेसायटींमधील व्यवस्थापन समितीकडून किती मिळकती भाडेतत्वावर दिल्या आहेत, प्रत्यक्षात मालक मिळकतींचा वापर करताे की नाही, जागा वापरात काही बदल केला गेला आहे का ? याविषयीची माहिती यातन मिळण्यास मदत हाेईल, असे पृथ्वीराज यांनी नमूद केले.
शहरात अनेकांच्या एक पेक्षा अधिक मिळकती आहेत, एकाच निवासी मिळकतीवर मिळकतधारकाला ४० टक्के सवलत देता येते. यामुळे एकापेक्षा जास्त मिळकत असणाऱ्यांची माहिती तसेच त्यांना दिली जाणारी सवलत याची माहिती यानिमित्ताने गाेळा केली जाईल असेही पृथ्वीराज बीपी यांनी सांगितले.