नवी दिल्ली : NEET-UG पेपर लीक प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. झारखंडमधील हजारीबागच्या ओएसीस महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि उपप्राचार्य यांच्यासह आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. डॉ. एहसान-उल-हक आणि इम्तियाज आलम अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. एहसान-उल-हक हा नीट परीक्षेचा को-ऑर्डिनेटर होता.
काय आहे प्रकरण?
गेल्या महिन्यात म्हणजे 5 मे रोजी नीटसाठी वेगवेगळ्या शहरात प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षेमध्ये घोळ झाल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर 26 जून रोजी सीबीआयने हजारीबाग येथील ओएसिस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एहसान उल हक यांची चौकशी केली होती.
शुक्रवारी सायंकाळी उशिरा 12 अधिकाऱ्यांचे पथक हजारीबाग येथे पोहोचले आणि त्यांनी प्राचार्य आणि उपप्राचार्याला अटक केली. गेल्या आठवडाभरापासून हजारीबागमधील NEET प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाचा तपास CBI करत आहे.