नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्याच्या सुरुवातीला रशियाला एक धावती भेट देणार आहेत. रशियाचे पंतप्रधान ब्लादिमिर पुतीन यांच्याबरोबर व्यापक द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी ते रशियाला जाणार आहेत, असे उच्चस्तरिय सूत्रांनी माध्यमांना सांगितले. जर नियोजनप्रमाणे मोदी रशियाच्या दौऱ्यावर गेले, तर त्यांचा हा पाच वर्षातला पहिला रशिया दौरा असेल. यापूर्वी २०१९ मध्ये रशियातल्या अतिपूर्वेकडील व्लादिस्कोस्की शहरात आयोजित आर्थिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ते रशियाला गेले होते.
मोदींच्या संभाव्य रशिया दौऱ्याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र मोदींच्या रशिया दौऱ्याची तयारी जोरात सुरू करण्यात आली असल्याचे मॉस्कोमधील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. ते निश्चित झाल्यानंतर दोन्ही देशांकडून त्याची औपचारिक घोषणा केली जाईल, असे रशियन राष्ट्राध्यक्षांचे सहाय्यक युरी उशाकोव्ह यांनी सांगितले.
मोदी एकच दिवसासाठी मॉस्कोमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि हा दौरा ८ जुलैच्या सुमारास होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र हे नियोजन अजून निश्चित झालेले नाही. दौऱ्याच्या तारखांबाबत वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला जातो आहे. या दौऱ्यादरम्यान भारत आणि रशिया वार्षिक शिखर परिषद देखील होऊ शकते. ही वार्षिक शिखर परिषद ३ वर्षांपासून होऊ शकलेली नाही. त्यामुळे ३ वर्षांनंतर मोदी आणि पुतीन यांच्यात ही शिखर परिषद होईल.
आतापर्यंत भारत आणि रशिया दरम्यान २१ वेळा ही वार्षिक शिखर परिषद झाली आहे. शेवटची शिखर परिषद ६ डिसेंबर २०२१ रोजी नवी दिल्ली येथे झाली होती. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पुतीन भारतात आले होते. त्या शिखर परिषदेदरम्यान भारत आणि रशियादरम्यान २१ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.
याशिवाय शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी भारत-रशिया भागीदारी नावाचे संयुक्त निवेदन देखील जाहीर केले गेले होते. दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी उझबेकिस्तानमधील समरकंद येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांच्यात अखेरची द्विपक्षीय चर्चा झाली होती.