मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 11 जागांसाठी निवडणूका पार पडणार आहेत. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 जुलै आहे. यामध्ये भाजपने बाजी मारत आपल्या ५ उमेदवारांची नावे जाहीर केली. यानंतर आता काँग्रेसकडून विधान परिषदसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.
प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर
काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या एकूण 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला निवडणूक पार पडणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटची तारीख आहे.
कोण आहेत प्रज्ञा सातव?
डॉ. प्रज्ञा सातव या दिवगंत काँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे 2014 ते 2019 दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांचं 2021 मध्ये आजारपणामुळे निधन झालं. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 2021 साली विधानपरिषदेवर त्यांची बिनविरोध निवड झाली होती. यानंतर आता त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.