आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘धर्मवीर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच धर्मवीर-2 ची घोषणा करण्यात आली. नुकतच या सिनेमाचं दुसरं पोस्टरही लॉन्च करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, महेश कोठारे,सचिन पिळगांवकर, बॉबी देओल ही मंडळी उपस्थित होती.
‘या’ दिवशी रिलीज होणार सिनेमा
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर धर्मवीर-2 हा सिनेमा असणार आहे. हा सिनेमा येत्या 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच हा सिनेमा हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री शिंदेनी सिनेमासाठी दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्री शिंदे यांनी या सिनेमासाठी शुभेच्छा देत म्हटलं की, मी धर्मवीर-2 सिनेमाचं आणि मंगेश देसाई यांचं खूप खूप अभिनंदन करतो. जेव्हा त्यांनी धर्मवीर हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यांनी मला या सिनेमासाठी सहकार्य हवं असं म्हटलं. त्यांच्या सिनेमासाठी मदत करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. कुठल्याही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयात आनंद दिघेंनी अढळ स्थान निर्माण केलं होतं. आनंद दिघेंचं कार्य हे एका सिनेमात उलगडूच शकत नाही. लोकांपर्यंत ते पोहचूच शकत नाही. त्यामुळे पहिला सिनेमा काढल्यानंतर लोकांना वाटलं आता पुढे काय? आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागातून त्या गोष्टी समोर येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसाद ओकच्या अभिनयाचंही कौतुक केलं.