बीजिंग : चीनबरोबरच्या चर्चेसाठी दलाई लामांनी आपले राजकीय प्रस्ताव दुरुस्त करावेत, अशी सूचना चीनने आज केली. तिबेटच्या संवेदनशीलतेचा आणि महत्वाचा अमेरिकेनेही आदर करावा,असेही चीनने म्हटले आहे. तिबेटच्या स्वायत्ततेसाठी अमेरिकेने मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ धरमशाला येथे तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांना भेटण्यासाठी आल्याच्या पार्श्वभुमीवर चीनकडून ही सूचना केली गेली आहे.
दलाई लामांबरोबरच्या चर्चेविषयी चीन सरकारचे धोरण ठाम आणि स्पष्ट आहे. चौदाव्या दलाई लामांनी त्यांच्या राजकीय प्रस्तावांवर पूर्णपणे चिंतन केले पाहिजे आणि आपले विचार पूर्णपणे दुरुस्त केले पाहिजे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.अमेरिकेच्या संसदेच्या माजी सभापती नॅन्सी पेलोसी आणि परराष्ट्र व्यवहार विषयक संसदीय समितीचेअध्यक्ष मायकेल मॅकॉल यांच्यासह अन्य रिपब्लिकन सदस्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी धरमशाला येथे दलाई लामांची भेट घेतली.
या भेटीशी संबंधित घडामोडींवर चीनकडून लक्ष ठेवले जाते आहे. या शिष्टमंडळाने तिबेटच्या समस्यांविषयी चर्चेसाठी चीनला आवाहन केले आहे. त्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने ही प्रतिक्रीया देण्यात आली आहे. तिबेटशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी राजकीय पुढाकार घेण्याच्या एका विधेयकावर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन स्वाक्षरी करणार आहेत. मात्र त्यांनी या कायद्यावर स्वाक्षरी करू नये असे आवाहन देखील चीनच्यावतीने केले गेले आहे.