पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाला दहा वर्षांपासून स्वतंत्र अधिकारी मिळालेला नाही. परिणामी इतर अधिकाऱ्यांवर त्याचा भार टाकावा लागत आहे. तरीही कोणतीही अडचण येत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
शवविच्छेदन विभागात मृत रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालयातील डाॅक्टर, कर्मचारी यांच्यामध्ये सातत्याने वादाचे प्रसंग उद् भवतात. शवविच्छेदनासाठी विलंब होणे, मृतदेहाची अदलाबदल होण्याच्या घटना देखील घडत आहेत. यावर अंकुश ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे या विभागात होणाऱ्या गोंधळाला कोण थांबविणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वायसीएम रुग्णालयाच्या विविध विभागाचे अद्ययावतीकरण केले जात आहे. शवविच्छेदन विभागाचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. मात्र, या विभागात स्वतंत्र अधिकारी न दिल्याने इतर अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देण्याची वेळ प्रशासनावर येत आहे. सध्या पीजी महाविद्यालयातील न्यायवैद्यक तज्ज्ञांवर या विभागाचा कारभार आहे. आकृतीबंधामध्ये नवीन पदनिर्माण करून नियुक्ती केली जाणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र, तोपर्यंत होणारी गैरसोय टाळण्याचे आव्हान रुग्णालय प्रशासनापुढे आहे.
पीजी महाविद्यालयात न्यायवैद्यक तज्ज्ञ आहेत. त्यांच्यावरच शवविच्छेदन विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. सध्या कोणतीही अडचण येत नाही. दहा वर्षांपासून इतर अधिकाऱ्यांवर कार्यभार देत आहे. आकृतीबंधामध्ये नवीन पदनिर्माण केले जाईल. त्यानंतर स्वतंत्र अधिकारी नेमण्याची कार्यवाही करण्यात येईल.
– डाॅ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, पीजी महाविद्यालय, वायसीएम.