जाधववाडी – झपाट्याने विकसित होणार्या पिंपरी चिंचवड शहरात सोसायट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु सोसायटीच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येत आहेत. त्याबाबतचे टेंडर सुरक्षा एजन्सीला दिले जाते. परंतु सुरक्षा एजन्सीकडे रात्रीपाळी करण्यासाठी तरुण नसल्याने वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना भरती करून सोसायटी रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात येत आहे. याकडे सोसायटीचे दुर्लक्ष होत असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास हे सुरक्षारक्षक कितपत योग्य भूमिका पार पाडू शकतात असा प्रश्न आहे.
सुरक्षा एजन्सीला रात्रपाळीकरिता तरुण वर्गाची संख्या फार कमी असल्याने रात्रीच्या वेळेस सुरक्षारक्षक म्हणून वयोवृद्धांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. याचा फायदा ठेकेदार व वयोवृद्धांना होत आहे. परंतु सोसायटीधारक यात गाफील आहेत. अनेक वयोवृद्ध घरी झोपायचे त्यापेक्षा कामाच्या ठिकाणी झोपू असा विचार करून जात असतील कितीही झोपायचे नाही ठरविले तरीही शरीर थकल्याने एक डुलकी तर होणारच. तर ठेकेदाराला 400 ते 450 रुपये तरुण सुरक्षारक्षकास मोजावे लागत असून वृद्धांना 250 ते 300 गुंडाळत आहेत. म्हणजेच ‘स्वस्तात मस्त पण सोसायटीधारक त्रस्त’ काही वृद्धांना ऐकायला कमी येते, काहींना साखर आहे, काहींना वयानुसार कामे होत नाहीत, काहींचे हात थरथरतात, काहींना कमी दिसते, रात्री सोसायटीत उशिरा वाहन आल्यास प्रवेशद्वार उघडायला लागणारा विलंब, वृद्धांनाही या वयात मी अजून कमावतोय याचा आनंद यातून वाढणारे अतिरिक्त व्यसन, व्यसनांच्या पायी होणारी अपूर्ण झोप याचा कामावर होणार परिणाम यात कामाच्या अतिताणामुळे उतारवयात होणारी घरात चिडचिड. हे सारे न परवडणारे आहे.
परिसरात अनेक ठिकाणी नव्याने बांधकामे सुरू आहेत. यात मोठ्या प्रमाणावर सिमेंट, स्टील, महागडे मटेरियल येत असून विकासकांनी देखील आपली सुरक्षितता अधिक भक्कम करण्याची गरज आहे, असे आवाहन चिखली मोशी चर्होली सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केले.
आठ तासांची शिफ्ट करावी
सोसायटीधारक इतके निर्धास्त कसे? ते झोपतात परंतु ज्याच्या हाती सुरक्षेची कमान आहे तेच झोपले तर तुमची सुरक्षितता धोक्यात आहे. कारण वृद्ध सुरक्षारक्षक बारा बारा तास शिफ्टमध्ये उभे राहून काम करू शकत नाहीत. यात त्यांना 8 तासांच्या तीन शिफ्ट केल्या तर रक्षकांची काम करण्याची क्षमताही वाढेल. सर्वच ठेकेदार असे असतातच असे नाही. काही जण प्रामाणिकही असतात. सोसायटीधारकांनी स्वस्तात मस्त सुरक्षा पाहू नये तर आपली सोसायटी, आपले घर आहे असू समजून हलक्यात घेऊ नये व एखादी अप्रिय घटना होण्याची वाट पाहू नये.
आम्ही ना इलाजास्तव सुरक्षा रक्षकाचे काम करत आहे. रात्री डासांचा मोठा त्रास असतो. रात्रभर जागून काम करतो. परंतु आम्हाला एजन्सीकडून वेळेवर पगार दिला जात नाही.
– एक वृद्ध सुरक्षारक्षक.
यात प्रामुख्याने सोसायटीधारकांची ही चूक आहे. कारण थोडा मेन्टेनन्स वाढवला की सर्वजण नाराजीचा सूर आळवतात. परिणामी उच्च दर्जाची सुरक्षा कशी मिळणार? सोसायटीधारकांनी मेन्टेनन्स वाढीवर कुरकुर न करता थोडे सोसून उच्च दर्जाची सुरक्षा मिळवून आपले कुटुंब व सोसायटी परिसर सुरक्षित करावा. सुदैवाने बहुतांश सोसायटींची सुरक्षा रामभरोसे आहे.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष चिखली, मोशी, चर्होली,हौसिंग सोसायटी फेडरेशन पिंपरी चिंचवड शहर.