नवी दिल्ली : भारताच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा शंभरावा पूर्ण सदस्य म्हणून पॅराग्वे सहभागी झाला आहे. पॅराग्वेने आज राष्ट्रीय राजधानीत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी होण्याबाबतचा पॅराग्वे सरकारतच्या मान्यतेचे पत्र आज सुपूर्द केले.
भारतातील पॅराग्वेचे राजदूत फ्लेमिंग राऊल ड्युअर्टे यांच्यासमवेत डिपॉझिटरी प्रमुख, परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव अभिषेक सिंग यांच्यासमवेत झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी मंजुरीचे पत्र सुपूर्द केले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ही कृती-केंद्रित, सदस्य संचालित, ऊर्जा निर्मिती, ऊर्जा सुरक्षा करण्यासाठी आणि त्याच्या सदस्य देशांमध्ये ऊर्जा संक्रमण चालविण्याचे साधन म्हणून सौर ऊर्जा तंत्रज्ञानाच्या वाढीव उपयोजनासाठी सहयोगी व्यासपीठ आहे.
पॅरिसमध्ये झालेल्या कोप-21 या हवामान बदल विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारत आणि फ्रान्सने मिळून ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन केली होती. सध्या या आघाडीमध्ये 119 देश सहभागी आहेत. मात्र त्यापैकी 99 देशांनी प्रत्यक्ष सहभागाची कागदपत्रे सुपूर्द केली आहे. मे महिन्यात स्पेनने 99 वा सदस्य देश म्हणून मान्यता पत्र सादर केले होते. आता यामध्ये पॅराग्वेचीही भर पडली आहे.