मुंबई : राज्यात पार पडणाऱ्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे यांच्या नावाचा समावेश आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 12 जुलै रोजी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी केंद्राने जाहीर केलीय, याचा आनंद आहे. पंकजाताईंना विधान परिषदेत स्थान दिले जावे,असा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता. तो भाजप केंद्रीय समितीने मान्य केला. त्याबद्दल मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महाराष्ट्र भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर भाजपकडून सावध पाऊलं उचलली जात आहेत. आगामी राजकीय समीकरणे विचारात घेऊन 5 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.