दहिवडी, (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाने सामाजिक न्याय व विशेष कार्य विभागाचे मुख्य सचिव सुमंत भांगे यांची भेट घेऊन वारकरी दिंडी सन्मान निधी प्रक्रिया सुलभ व सोपी असावी व रक्कम थेट लाभधारक दिंडी किंवा दिंडी मालक यांच्या नावावर जाण्याबाबत चर्चा केली असल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष हभप अक्षय महाराज भोसले यांनी दिली.
मानाच्या दहा पालखी सोहळ्यांतील १५०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान मिळण्यासाठी दिंडी सन्मान निधीबाबत भांगे यांच्याशी चर्चा केली. असे सांगून भोसले म्हणाले, वारकरी हित लक्षात घेऊन प्रक्रिया सुलभ असावी हा आग्रह त्यांच्यासमोर मांडला.
त्याला पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्याअध्यक्षतेखालील समितीद्वारा अनुमोदन देत लवकरात लवकर हा निधी वितरित करण्यात येणार आहे. शासनाद्वारे निर्देशित असणाऱ्या दहा मानाच्या पालखी सोहळ्यातील अधिकृत १५०० दिंड्यांची माहिती नोंदणी आमच्याकडे आहे.
ज्या दिंडीकडे खाते नसेल त्या दिंडीप्रमुखाचे नाव ग्राह्य धरले जाईल जे मंदिर, संस्थान दरबारी नोंदणीकृत असेल अथवा ते जे अधिकृत सांगितील त्याप्रमाणे कार्यवाही होईल.
या दिंडीच्या खात्यावर तसेच खाते नसल्यास दिंडी प्रमुखाच्या खात्यावर दिंडी नोंदणी नावानुसार निधी वर्ग करण्यात येईल. त्यासाठी दिंडी प्रमुखांचे अचूक खाते क्रमांक माहिती, बँक नाव, शाखा नाव व आयएफएससी कोडं ही माहिती दिंडी प्रमुखांनी तात्काळ भरुन द्यावी. सर्व माहिती एकत्रित फॉर्मवर संकलन करुन आम्ही शासन दरबारी देणार आहोत, शी माहिती त्यांनी दिली.