सातारा, (प्रतिनिधी)- हृदय आणि फुफ्फुसाच्या अतिगंभीर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पिंपरी (पुणे) येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने उत्तेकरनगर, सदरबझार येथील हार्टलाइन डायग्नोस्टिक प्रा. लि. आणि प्रतिभा हॉस्पिटलमध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरू होत आहे.
तेथे या रुग्णांना तज्ज्ञांकडून समुपदेशन आणि मार्गदर्शन मिळणाणार आहे. प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी आवश्यक बाह्यरुग्ण उपचार उपलब्ध होणार असल्याची माहिती फुफ्फुस प्रत्यारोपण व श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. राहुल केंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डीपीयूचे सरव्यवस्थापक दीपक पाटील, प्रतिभा हॉस्पिटलचे डॉ. संजय साठे, डॉ. समीर चव्हाण, शस्त्रक्रिया झालेल्या माजी प्राचार्या सुजाता पवार उपस्थित होत्या. डॉ. केंद्रे म्हणाले, फुफ्फुसाचे दुर्धर आजार आणि कोविडमुळे लंग फायब्रोसिस झालेल्या रुग्ण अंथरुणावर खिळून राहतात.
या रुग्णांच्या वेळ आणि खर्चाची बचत करण्यासाठी डीपीयू सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने हार्टलाइन डायग्नोस्टिक (अध्यक्ष डॉ. रमेश चौगुले) आणि प्रतिभा हॉस्पिटल (हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे व श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. संजय साठे) या ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू होत आहे. सातारा येथील, विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या अथवा अतिगंभीर आजाराने त्रस्त रुग्णांना काही वेळा अवयव प्रत्यारोपण करावे लागते. या रुग्णांना हैद्राबाद, चेन्नई येथे उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे मोठा खर्च होतो. आता पुण्यातील डीपीयू हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणाच्या सेवासुविधा, अनुभवी व कुशल डॉक्टरांची टीम उपलब्ध होणार आहे, सातारा परिसरातील रुग्णांना या सुविधेचा लाभ होणार आहे.
माजी प्राचार्या सुजाता पवार (वय 54) म्हणाल्या, डीपीयू सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी माझी फुफ्फुस प्रत्यारोपणाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यामुळे मला जणू पुनर्जन्मच मिळाला आहे. डीपीयू हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागाची माहिती आणि या सेवेचा लाभ हृदय व फुफ्फुस विकारांनी त्रस्त रुग्णांनी अवश्य घ्यावा.