पिंपरी, (प्रतिनिधी) – कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग येथे मोटार सायकल (दुचाकी) पास होईल असे बोलार्ड बसविल्यास कासारवाडीतील नागरिकांची प्रचंड मोठी गैरसोय होणार आहे.यामुळे येथे बोलार्ड बसवू नये, अशी मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे आणि माजी नगरसेवक शाम लांडे यांनी केली आहे.
भोसरी विभागाचे पोलीस वाहतूक निरीक्षक बी. आर. साळुंखे, यांना याबाबतचे दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग व पुणे-मुंबई महामार्ग अंडरपास येथे वाहतूककोंडी होत असल्याने, पिंपरी चिंचवड महापालिका बी.आर.टी.एस. विभाग व भोसरी वाहतूक विभाग यांनी या रस्त्याची पाहणी केली.
या ठिकाणी असलेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग येथे मोटार सायकल (दुचाकी) पास होईल, असे बोलार्ड बसविण्यात येणार आहे. तर कासारवाडीमध्ये गणेशोत्सव काळात होणारे सार्वजनिक गणपती मंडळाचे विसर्जन असते.
एक गाव एक शिवजयंती निमित्त होणारी मिरवणूक मोठी असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त होणारी मिरवणूक तसेच रामनवमी, हिंदू नववर्ष (गुडी पाडवा), बसवराज महाराज मिरवणूक, मुस्लीम धर्मीयांची ईद-ए-मिलादसाठी बोलार्ड सर्वात मोठा अडथळा असणार आहे. समस्त ग्रामस्थ कासारवाडी यांच्या वतीने भैरवनाथ यात्रा दरवर्षी आयोजित केली जाते.
यात्रेचा पालखी सोहळा हा संपूर्ण कासारवाडी भ्रमण असते. कासारवाडी मधील वरील भागात होणारे अंत्यविधी तसेच आपत्कालीन काळात अग्निशामक, रुग्णवाहिका हे सर्व कासारवाडीच्या पश्चिम भागातून पूर्व भागात व पूर्व भागातून पश्चिम भागात जात असतात. त्यामुळे असे बोलार्ड बसविल्यास, सर्व धार्मिक कार्यक्रमांना बाधा होणार आहे.
बोलार्ड बसविल्याने या भागात होत असलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. याठिकाणी कासारवाडीचे प्रश्न लक्षात घेऊन योग्य व न्याय उपाययोजना करण्याची मागणी या पत्रात केली आहे.