वाई,(प्रतिनिधी) – वाई एमआयडीसीत काल (मंगळवारी ) रात्री आठ वाजता झालेल्या गोळीबारातील फरार झालेला संशयित आरोपी अक्षय नंदकुमार निकम (रा. रविवारपेठ, वाई) याला पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे.
यातील जखमी अमन इस्माईल सय्यद याची प्रकृती ठीक असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमन व अक्षय यांच्या पूर्व वैमन्यसातून ही फायरिंग झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमन सय्यद ( वय २४, व्यवसाय बाऊंसर रा. बोपर्डी, ता. वाई, हल्ली रा.२३०२ संकेत पार्क महंमदवाडी पुणे) याचे बोपर्डी येथे राहत असताना अक्षय निकम याच्या सोबत भांडण झाले होते. त्या भांडणात अक्षय निकम यास सत्तुरने वार करुन जखमी केल्याने वाई पोलीस ठाणे येथे अमनवर गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा न्याय प्रविष्ठ आहे.
या खटल्याची सुनावणी २४/०६/२०२४ रोजी असल्याने अमन सय्यद वाई न्यायालयात हजर राहण्यासाठी बोपर्डी येथील चुलत्यांच्या घरी मुक्कामी आला होता. एमआयडीसी येथील चांदणी चौकातील कट्ट्यावर सांकाळी ७.४५ वाजता तो गप्पा मारत बसला होता.
यावेळी समोरून अचानकपणे एकाने त्याच्यावर पिस्तूल रोखून गोळी झाडली. गोळी अमनच्या उजव्या हातात मनगटास लागली. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या गडबडीत तो खाली पडल्याने त्याच्या गुडघ्यास खरचटले.
त्यानंतर त्याने मित्रांना फोन करून बोलावून घेतले त्याच्या मित्रांनी त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत संशयित आरोपी फरार झाली होते. पोलिसांनी अक्षयचा माग काढत त्याला मुंबईतून ताब्यात घेतल्याचे समजते. अक्षय नंदकुमार निकम हा नागपुर जिल्हा कारागृहात असलेल्या निकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईज, ता.वाई) याचा मित्र असून या घटनेत बंटी जाधवचा काही संबंध आहे का ? पुण्यात वापरलेले पिस्तूल कोठून मिळवले आधी तपास वाई पोलीस करीत आहेत.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक अरुण देवकर व टीम, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे दाखल झाले होते. पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे अधिक तपास करत आहेत.