मेढा (प्रतिनिधी) – महाबळेश्वर-सातारा रस्त्यावर आंबेघर तर्फ मेढा (ता. जावळी) गावच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी 7.30 च्या सुमारास मारुती स्विफ्ट कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार प्रवीण कोंडिबा कासुर्डे (वय 40, रा. वरोशी, ता. जावळी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला सिद्धांत संतोष कदम (वय 17, रा. वरोशी) हा गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी कारचालकावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सिद्धांतला उपचारांसाठी सातारा येथे पाठवले. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वरोशी येथील प्रवीण कासुर्डे हे टीव्हीएस लुना (एमएच-11-वाय-5283) वरून दूध घालण्यासाठी मेढा येथे निघाले होते. सिद्धांत कदम हा इयत्ता 12 वीत शिकणारा युवक मागे बसला होता.
ही दुचाकी आंबेघर तर्फ मेढा गावच्या बस स्टॉपच्या पुढे आली असता, महाबळेश्वरकडे निघालेल्या स्विफ्ट कारने (एमएच-43-एल-3750) दुचाकीला जोराची धडक दिली.
या अपघातात प्रवीण कासुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सिद्धांत कदम हा गंभीर जखमी झाला आहे. तो मेढा येथे कॉलेजला निघाला होता. प्रवीण कासुर्डे हा शेती व दुग्ध व्यवसाय करून, कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी सपोनि अश्विनी पाटील व हवालदार बेसके तपास करत आहेत.