निमोणे : शिरूर तालुक्यातील न्हावरे-निर्वी रोड येथे दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (३०जून) रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. प्रकाश संपत शेलार (वय ३७ रा.निर्वी, ता. शिरूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी बंडू बापूराव शेलार (रा. निर्वी ता. शिरूर) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मच्छिंद्र गोविंद माळी (वय अंदाजे ४०, मूळ रा. पिंपरखेड, ता. नांदगाव, जि. नाशिक) या दुचाकीस्वाराच्या विरोधात अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बंडू शेलार यांचा पुतण्या प्रकाश हा न्हावरे येथून त्याच्या दुचाकीवरून (एम एच -१२ -डी क्यू ९९६०) निर्वीकडे जात होता. यावेळी प्रकाश हा ड्रीम फिटनेस क्लबजवळ गेल्यानंतर निर्वी बाजूकडून येणाऱ्या दुचाकी क्रं (एम एच १७ के एच ३०८१) दुचाकीवरील मच्छिंद्र याने भरधाव वेगाने प्रकाश याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. मच्छिंद्र याने निष्काळजीपणे दुचाकी चालवून समोरून येणाऱ्यास धडक दिली असून या अपघातात प्रकाश संपत शेलार यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.