सातारा, (प्रतिनिधी)- कान दुखून त्यातून पाणी येत असल्याचा त्रास होत असल्याने सचिन नानासो गायकवाड (वय ३८, रा. विघ्नहर्ता सोसायटी, कोंडवे, ता. सातारा) याने दि. २८ रोजी कोंडवे येथे गळफास लावून आत्महत्या केली.
याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दीपक नानासो गायकवाड (वय ४४) यांनी फिर्याद दिली आहेत. हवालदार शिंदे तपास करत आहेत.
साताऱ्यात दोन जुगार अड्ड्यांवर कारवाई
सातारा येथील मोळाचा ओढा येथे जगदंब पान शॉपच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगारावर छापा टाकत पोलीसांनी फिरोज कुतबुद्दीन झारी (वय ५२, रा. रेणुका हॉसिंग सोसायटी, मोळाचा ओढा) याच्यावर कारवाई केली.
तसेच वाढे फाटा येथील साई हॉटेलसमोरील टपरीच्या आडोशाला जुगार घेणाऱ्या वामन पांडुरंग मोरे (वय ३५, रा. कामाठीपुरा, गोडोली) याच्यावरही कारवाई केली. शाहूपुरी पोलिसांनी दि. २८ रोजी दोन्हीही कारवाया केल्या आहेत.
अल्पवयीन मुलाला पळवले
सातारा, शेंद्रे (ता. सातारा) येथील हॉटेल किनारा येथून १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला अजय रामकरण निषाद (रा. उत्तर प्रदेश) याने दि. २६ रोजी फूस लावून पळवून नेले. मजुरीसाठी लातूरहून येथे आलेल्या ३५ वर्षीय महिलेले सातारा तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक बोडरे तपास करत आहेत.
अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई
सातारा, माळ्याचीवाडी (ता. सातारा) येथे दि. २७ रोजी उमेश नारायण पवार (वय ३७, रा. धावडशी, ता. सातारा) अवैधरीत्या देशी दारुची विक्री करत होता. सातारा तालुका पोलीस ठाण्यातील शिवाजी वायदंडे यांनी त्याच्यावर कारवाई केली.
दोघांकडून महिलेचा विनयभंग
सातारा,- महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच शिवीगाळ करत दमदाटी केल्याप्रकरणी वैभव भोसले, सागर चव्हाण (पूर्ण नाव माहिती नाही, दोघेही रा. महागाव, ता. सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हा प्रकार माहुली रेल्वे स्टेशनसमोरील हॉटेलमध्ये दि. २६ रोजी रात्री ९.३० वाजता घडला. संबंधित महिलेच्या फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा नोंद झाला. हवालदार देशमुख तपास करत आहेत.